पुणे, दि. २९ : रोटरी क्लब अमनोराच्या अध्यक्षपदी स्मिता कसमळकर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डीडी मिश्रा यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच, क्लबच्या सचिवपदी हर्षा घोरपडे यांची निवड करण्यात आली.
अमनोरा येथील फर्न हॉटेलमध्ये झालेल्या पदग्रहण समारंभात नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले, सहाय्यक प्रांतपाल अजय चिटणीस, रोटरीचे पदाधिकारी, सदस्य तसेच त्यांच्या कुटुंबीयांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर बोलताना
स्मिता कसमळकर यांनी आगामी वर्षात क्लबच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि विविध समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले.
प्रमुख पाहुणे नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले यांनी रोटरीच्या कार्याचा गौरव करताना समाजातील तळागाळातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी प्रत्येक रोटरी सदस्याने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
समारंभात नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले. उपस्थितांनी नव्या नेतृत्वाला शुभेच्छा देत आगामी वर्षात विविध सामाजिक प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत विश्वास व्यक्त केला.

إرسال تعليق