पुणे : परम पूज्य डॉ. अभिनव मानतुंगाचार्य, ज्योतिषाचार्य १०८ श्री प्रणामसागरजी महाराज (भक्तामर वाले बाबा) यांच्या पावन सान्निध्यात ‘भक्तामरमय चातुर्मास – पुणे २०२६’ अंतर्गत चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सव भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गंगाधाम येथील नाजुश्री भवन येथे रविवारी (९ ऑगस्ट) झालेल्या या धार्मिक सोहळ्यास सकल जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शोभा धारीवाल, मिलिंद फडे, अचल जैन, डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह भक्तामर प्रभावना चातुर्मास समिती यांच्या आयोजनातून आणि सकल जैन समाज, पुणे यांच्या निवेदनातून हा मंगलमय सोहळा उत्साहात पार पडला.
या मंगलमय सोहळ्यात विधिवत मंगल कलश स्थापना, गुरु पूजन आणि भक्तामर स्तोत्राचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. परम पूज्य श्री प्रणामसागरजी महाराज यांच्या सान्निध्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
सुप्रसिद्ध संगीतकार श्री. प्रवीण जी चौगुले यांच्या मधुर भजनांनी कार्यक्रमात भक्तिरसाची अनुभूती निर्माण केली. तसेच देशातील प्रसिद्ध सूत्रसंचालक श्री. प्रवीण जी लोहाड़े यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.
यावेळी ‘घर-घर भक्तामर, हर घर भक्तामर’ हा पवित्र संकल्प उपस्थित भाविकांनी घेतला. भक्तामर स्तोत्राच्या माध्यमातून अध्यात्मिक संस्कार, सकारात्मकता आणि धार्मिक भावनेचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. चातुर्मास हा आत्मचिंतन, साधना, संयम आणि धार्मिक आराधनेचा पवित्र काळ असून, या कालावधीत विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील सकल जैन समाजाने या चातुर्मासातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.



إرسال تعليق