पुणे : समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देणारे वरिष्ठ पत्रकार स्वप्नील बापट यांनी नुकतेच आपले ५५ वे रक्तदान केले. दरवर्षी किमान चार वेळा रक्तदान करण्याचा संकल्प त्यांनी केला असून, या संकल्पातून ते विविध निमित्ताने नियमितपणे रक्तदान करत असतात.
स्वातंत्र्य दिनाचा उत्सव रक्तदान करून साजरा करण्याची त्यांची परंपरा आहे. यावर्षी काही कारणांमुळे मागील महिन्यात रक्तदान करणे शक्य झाले नाही. मात्र, संधी मिळताच त्यांनी रक्तदान करून आपला संकल्प कायम ठेवला.
याबाबत स्वप्नील बापट म्हणाले, “दरवर्षी किमान चार वेळा रक्तदान करायलाच हवे, या आग्रहापोटी मी वेगवेगळी निमित्ते शोधत राहतो. यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्तदान करता आले नाही; मात्र आज संधी मिळताच रक्तदान केले. हे माझे ५५ वे रक्तदान आहे.”
“रक्तदान करण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही. आपणही कोणाला तरी जीवदान देण्यासाठी हातभार लावू शकतो. एका रक्तदानातून तीन जणांना मदत होऊ शकते, ही भावना अधिकाधिक लोकांमध्ये रुजणे गरजेचे आहे. रक्तदानाचे महत्त्व समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असेही त्यांनी सांगितले.
नियमित रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी आणि पात्र व्यक्तींनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन स्वप्नील बापट यांनी केले. आपल्या ५५ व्या रक्तदानाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.


إرسال تعليق