Top News

‘युवा मानसरंग’ कार्यशाळेतून युवकांना मानसिक आरोग्य व आत्महत्या प्रतिबंधाचा संदेश

 पुणे : परिवर्तन संस्था अंतर्गत YARDI प्रकल्पाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे येथे दोन दिवसीय ‘युवा मानसरंग – Youth Mental Health’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. युवकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, भावना व अडचणी मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे तसेच गरजेच्या वेळी योग्य मदत घेण्याचे महत्त्व समजावून देणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

डॉ. हमीद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. संवादात्मक उपक्रम, गटचर्चा, सहभागात्मक कृती आणि विविध अनुभवाधारित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर संवाद साधण्यात आला.

कार्यशाळेच्या माध्यमातून ‘युवा मानसरंग संवादक’ तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षित संवादकांच्या माध्यमातून महाविद्यालयीन परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, मानसिक तणावाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक भावनिक आधार देणे तसेच गरज भासल्यास त्यांना योग्य तज्ज्ञ सेवांशी जोडणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 


कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी समारोप प्रसंगी १० सप्टेंबर – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी परिवर्तन संस्थेच्या तज्ज्ञ समुपदेशक रेश्मा कचरे, पूजा भालेराव आणि ब्रह्मनाथ निळकंठ यांनी विद्यार्थ्यांशी मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध आणि भावनिक आधार याबाबत संवेदनशील संवाद साधला.

या सत्रात आत्महत्येबाबत असलेले गैरसमज, मानसिक तणावाच्या काळात निर्माण होणाऱ्या अडचणी, मदत मागण्याचे महत्त्व, संकटात असलेल्या व्यक्तीशी संवेदनशीलपणे संवाद कसा साधावा तसेच योग्य वेळी मदत आणि आधाराशी व्यक्तीला कसे जोडावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य चव्हाण सर यांनी मानसिक आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत युवकांसाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांची गरज प्रत्येक महाविद्यालयात असल्याचे सांगितले. तसेच दोन दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या युवा मानसरंग संवादकांचे अभिनंदन करून त्यांनी महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्येही मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेतून “मानसिक आरोग्याबद्दल बोलणे ही कमजोरी नसून स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्याची महत्त्वाची पायरी आहे” हा संदेश देण्यात आला. आत्महत्या प्रतिबंध ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून, गरज असलेल्या व्यक्तीचे संवेदनशीलपणे ऐकून घेणे, तिच्या सोबत उभे राहणे आणि योग्य वेळी मदतीशी जोडणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

“मोकळेपणाने बोलूया, संवेदनशीलपणे ऐकून घेऊया, गरज असेल तेव्हा मदत मागूया आणि गरज असलेल्या व्यक्तीच्या सोबत उभे राहूया.”

अशा प्रकारच्या कार्यशाळा आपल्या इथे घ्यायचे असतील किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर नक्की संपर्क करा परिवर्तन संस्था -9561911320

Post a Comment

أحدث أقدم
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume