पुणे, १० ऑगस्ट २०२६ : यश ज्वेलरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे उद्योजिका सौ. अनिता क्षीरसागर लिखित ‘सुवर्ण विक्री कौशल्य’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (१० ऑगस्ट) मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एम.बी. अष्टेकर ज्वेलर्सचे चेअरमन दिनकर माधवराव अष्टेकर, आकांक्षा ज्वेलर्सचे संचालक राहुल प्रकाश क्षीरसागर, प्रकाश नारायण सराफचे संचालक संजय सराफ, प्रेरक वक्ते महेंद्र देवळेकर, पुष्कर अष्टेकर आणि तुषार अष्टेकर यांच्यासह ज्वेलरी क्षेत्रातील अनेक शॉप ओनर्स उपस्थित होते.
सोन्या-चांदीचा व्यवसाय अधिक प्रभावीपणे कसा करावा, व्यवसायाची गुणवत्ता व व्याप्ती वाढवून ‘शॉप टू शोरूम’ संकल्पना कशी साकारावी, तसेच ज्वेलरी विक्री क्षेत्रातील सेल्स पर्सनने कोणती कौशल्ये आत्मसात करावीत, यासह ज्वेलरी व्यवसायाशी संबंधित विविध विषयांचे अभ्यासपूर्ण ज्ञान मिळणे आवश्यक आहे. या उद्देशाने सौ. अनिता क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नांतून यश ज्वेलरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या प्रशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे ज्वेलरी व्यवसायातील व्यावसायिक कौशल्ये, विक्री तंत्र, ग्राहकांशी संवाद, व्यवसायवृद्धी आणि आधुनिक पद्धतींचे ज्ञान देण्यावर भर दिला जात आहे. यासंदर्भात कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
ज्वेलरी उद्योगाला अधिक सक्षम आणि व्यावसायिक स्वरूप देण्याबरोबरच या क्षेत्रातील व्यावसायिकांना आवश्यक कौशल्य व ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी यश ज्वेलरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहेत, अशा शब्दांत मान्यवरांनी सौ. अनिता क्षीरसागर यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. तसेच ‘सुवर्ण विक्री कौशल्य’ या पुस्तकासाठी आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ज्वेलरी क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि वाढती स्पर्धा लक्षात घेता प्रशिक्षण व कौशल्यविकासाला महत्त्व देणे ही काळाची गरज असून, यश ज्वेलरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या दिशेने सुरू असलेले कार्य ज्वेलरी व्यावसायिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.



Post a Comment