Top News

'पीसीईआरएफ'च्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त 'कॉन्स्ट्रो २०२७' आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची घोषणा

 पुणे: "शेतीनंतर मानवी जीवनातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा व्यवसाय असलेले बांधकाम क्षेत्र प्राचीन आणि समृद्ध आहे. प्रदीर्घ काळापासून मानवाने स्वतःसाठी निवारा निर्माण करण्यापासून या क्षेत्राची सुरुवात झाली आहे. आधुनिक काळात या क्षेत्रात सिमेंट, कंक्रीट, लिफ्ट्स, एस्कलेटर यांसारखे नवनवीन शोध व तंत्रज्ञान आले असून या क्षेत्राचे महत्त्व अतोनात वाढले आहे. बदलत्या काळानुसार बांधकाम क्षेत्रात सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती विकसित व्हावी," असे मत प्रख्यात वास्तुरचनाकार आर्कि. व्ही. व्ही. बडवे यांनी व्यक्त केले.

पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाऊंडेशनच्या (पीसीईआरएफ) ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्य्रक्रमात बडवे बोलत होते. शिवाजीनगर येथील हॉटेल तरवडे क्लार्क्स इन येथे आयोजित कार्यक्रमावेळी 'पीसीईआरएफ'चे अध्यक्ष इंजि. नरेंद्र कोठारी, सचिव आर्कि. शिरीष केंभावी, ज्येष्ठ सदस्य अशोक बेहरे, वामनराव कुलकर्णी, जयंत इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी 'पीसीईआरएफ'तर्फे जे. पी. श्रॉफ, विश्वास लोकरे, संजय वायचळ, श्रीकांत निवसरकर आदींचा सन्मान करण्यात आला. बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या 'कॉन्स्ट्रो २०२७' आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली. तसेच हैदराबाद येथील 'हिटेक्स एक्झिबिशन सेंटर' येथे होणाऱ्या 'कॉन्स्ट्रो' प्रदर्शनासाठी हायबीज संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला. 


बांधकाम क्षेत्राच्या विकासाबरोबरच कामगारांची सुरक्षितता आणि पर्यावरणाचे संरक्षण यांनाही समान महत्त्व दिले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती विकसित करण्याची गरज आहे. संशोधनातून निर्माण होणारे ज्ञान प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रात पोहोचले, तर भविष्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम, टिकाऊ आणि सुरक्षित होतील, असेही बडवे यांनी नमूद केले.

नरेंद्र कोठारी म्हणाले की, 'कॉन्स्ट्रो'सारख्या उपक्रमांमधून नवीन तंत्रज्ञान प्रत्यक्ष क्षेत्रापर्यंत पोहोचण्यास आणि त्याचा प्रभावी वापर करण्यास मदत होते. हे प्रदर्शन हे केवळ नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञान दाखविण्याचे माध्यम नसून ज्ञानाची देवाणघेवाण आणि अनुभवांची सांगड घालणारे प्रभावी व्यासपीठ आहे. भारताच्या पायाभूत विकासाला गती देण्यासाठी अशा ज्ञानाधारित उपक्रमांची भूमिका महत्त्वाची आहे.”


आर्कि. शिरीष केंभावी म्हणाले, "पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशनची स्थापना १९८३ मध्ये झाली. नवीन साहित्य, पद्धती व तंत्रज्ञानाची माहिती पोहोचविण्यासह कौशल्य विकासाला चालना देणे हा संस्थेचा उद्देश आहे. ‘कॉन्स्ट्रो’, ‘स्टुडंट अवॉर्ड्स’, ‘युकॉन्स’ आणि ‘सेफ्टी अवॉर्ड्स’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचे सहा-सात प्रकल्प पेटंटच्या अंतिम टप्प्यात असून, बांधकाम क्षेत्राच्या प्रगतीसोबतच सुरक्षा, संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाला प्राधान्य देणे आवश्यक आहे."

'पीसीईआरएफ'च्या पाठिंब्यामुळे कॉन्स्ट्रो प्रदर्शन हैदराबादमध्ये आयोजित केले जात आहे. बांधकाम क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि तंत्रज्ञांसाठी हे एक मोठे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास हायबीजच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. संध्या राणी यांनी नमूद केले.

Post a Comment

أحدث أقدم
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume