Top News

विसाव्या शतकातील हुकूमशाह’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन

पुणे : भारताचे संविधान लोकशाहीवादी असून त्यात कोणतेही बदल झालेले नाहीत. मात्र, २०१४ नंतर देशात हुकूमशाहीची वृत्ती निर्माण झाली आहे. हिटलरने प्रभावी भाषणांच्या जोरावर सत्ता मिळवली आणि त्यानंतर तो हुकूमशहा झाला. आपल्या देशातही २०१४ नंतर हुकूमशहाचा जन्म झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील भाजपच्या हुकूमशाहीचा शिकार झाला आहे. मात्र, ‘झेन झी’ने मोदींना झुकवले आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केले.

अशोक कुमार पांडेय लिखित, मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित आणि मीना शेटे-संभू अनुवादित ‘विसाव्या शतकातील हुकूमशाह’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात वानखेडे बोलत होते. गांधी भवन, कोथरूड येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे होते. खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (दिल्ली), महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि लेखक अशोक कुमार पांडेय यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर जांबुवंत मनोहर, शरद अष्टेकर, मीना शेटे-संभू, सचिन पांडुळे आदी मंचावर उपस्थित होते. 


अशोक वानखेडे यांनी पुढे सांगितले की, न्यायालय आणि निवडणूक आयोग आपल्या जवळ आले की सत्ता मिळवता येते. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले; मात्र ते आरोप खोडून काढण्यात काँग्रेस कमी पडली. काँग्रेसची ही घोडचूक भाजपच्या सत्तेत येण्यास कारणीभूत ठरली. आज तरुण आपला आवाज उठवत आहेत. तरुणांना आपले विचार मांडू द्या, त्यांना प्रश्न विचारू द्या, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.

अमोल कोल्हे म्हणाले, हुकूमशाहीचा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या सत्तेपासून सुरू होत नाही, तर त्यासाठी आधी राजकीय आणि सामाजिक वातावरण तयार केले जाते. मन, मनगट आणि विचार शाबूत असतील तर सत्तेला प्रश्न विचारता येतात. आपण विचार करणे थांबवले तर आपल्यात आणि मेंढरात काय फरक आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लेखक अशोक कुमार पांडेय यांनी ‘२१व्या शतकातील पराभूत हुकूमशहा’ या विषयावर पुस्तक लिहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लेखक अशोक कुमार पांडेय म्हणले, प्रत्येक हुकूमशहाला जेव्हा आपले आता कोणीच काही करू शकत नाही, असे वाटू लागते, तेव्हाच तो चुका करायला सुरुवात करतो. हुकूमशाहीच्या उदयामागील मानसिकता, राजकीय परिस्थिती आणि तिचे समाजावर होणारे परिणाम यांचा चिकित्सक अभ्यास या पुस्तकातून करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय आवटे यांनी इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. गांधी, नेहरू आणि आंबेडकर हे आपले रोडमॅप आहेत. आपण इतिहास वाचला पाहिजे, कारण इतिहास हा समकालीन असतो. सर्व हुकूमशहांना कवी आणि साहित्यिकांची भीती वाटत असते, कारण साहित्य आणि विचार समाजाला प्रश्न विचारण्याची ताकद देतात, असे त्यांनी सांगितले.

भारत हा बुद्ध आणि गांधींच्या विचारावर चालणारा देश आहे. जो पर्यंत त्यांचे विचार आपल्यामध्ये राहतील तोपर्यंत देश हुकुमशाही पासून दूर असेल असे मत अतुल लोंढे यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर यांनी केले. सूत्रचनलन तेजस भालेराव, मुस्कान नदाफ यांनी तर रोहन गायगवाड यांनी आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume