Top News

गणेशखिंड रस्त्यावरील ५२९ झाडांची नियोजित वृक्षतोड थांबवून वृक्ष संवर्धन करा; आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुणे मनपा आयुक्तांना पत्र

 पुणे: गणेशखिंड रस्त्याच्या रिझर्व्ह बँक इन्स्टिट्यूट ते संचेती चौक दरम्यानच्या ४५ मीटर रुंदीकरणासाठी सुमारे ५२९ ऐतिहासिक आणि जुने वृक्ष कापण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या प्रस्तावाला आता तीव्र विरोध सुरू झाला असून, या प्रकरणात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या मा.उपसभापती आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट हस्तक्षेप केला आहे. मनपा प्रशासनाने १ मार्च २०२६ रोजी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणासमोर मांडला होता आणि २ एप्रिल रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती मागवल्या होत्या. या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी तब्बल ७,००० हरकती नोंदवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी पुणे मनपा आयुक्तांना पत्र लिहून प्रशासनाचे लक्ष वेधले असून, ही नियोजित वृक्षतोड त्वरित थांबवण्याची आणि वृक्ष संवर्धन करण्याची आग्रही मागणी केली आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन नियमानुसार एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या हरकतींवर नागरिकांना प्रत्यक्ष बोलावून त्यांची सुनावणी घेणे आवश्यक आहे. मेट्रो लाईन-३ च्या पिलर्समुळे रस्त्याची रुंदी काही ठिकाणी आधीच मर्यादित झाली असल्याने, केवळ झाडे कापून वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटणार नाही. याउलट, 'परिसर' संस्थेने तसेच पर्यावरण संस्थांनी सुचवलेल्या पर्यायी डिझाईनचा वापर केल्यास, रस्त्याच्या उपलब्ध जागेतच सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्गासह उत्तम नियोजन करणे शक्य आहे, ज्यामुळे एकही झाड कापण्याची गरज पडणार नाही.


या समस्येवर सुवर्णमध्य काढण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी मनपा प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या प्रस्तावाला तूर्तास स्थगिती देऊन, पुढील ८ दिवसांत मनपाचे नगर अभियंता, वाहतूक पोलीस, 'परिसर' संस्था आणि मॉडेल कॉलनी पर्यावरण समितीच्या प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीत तज्ज्ञांच्या पर्यावरणपूरक डिझाईनचा प्रत्यक्ष जागेवर पडताळा घेऊन पुढील काम करावे, असे त्यांनी सुचवले आहे. पुणेकरांचा विकासकामांना विरोध नाही, परंतु पर्यावरणाचा समतोल राखून आणि जनभावनेचा आदर करून प्रशासनाने यावर सर्वसमावेशक निर्णय घ्यावा, अशी विनंती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume