Top News

सन्मती बाल निकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 



पुणे
: सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बाल निकेतन आणि तीर्थरूप शैक्षणिक वसतिगृह येथे मंगलम योग यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेतील सर्व विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्गाने या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रशिक्षित योग शिक्षक विक्रम सिंह तोमर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम, ओंकार साधना तसेच ध्यान यांचा प्रत्यक्ष अनुभव दिला. योगाभ्यासादरम्यान त्यांनी सातत्याचे महत्त्व अधोरेखित करत, एखादी गोष्ट करताना खंड पडला किंवा चूक झाली तरी निराश न होता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची सवय विकसित करण्याचा संदेश दिला. योग हा केवळ शरीराचा नव्हे तर मनाचाही व्यायाम असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी हास्याचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांकडून हास्ययोगाचे प्रात्यक्षिक करून घेतले. मुलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत परिसर आनंदमय केला. यावेळी डॉ. संजय नाईक आणि डॉ. पीयूष नाईक हे देखील मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महेश कोटुळे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. यंदाची Yoga for Healthy Ageing (Wellness, Wisdom, and World Peace) ही संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी योग हा निरोगी, संतुलित आणि गुणवत्तापूर्ण जीवनाचा आधार असल्याचे सांगितले. "न रोगो न जरा तस्य योगाग्निमयशरीरिणः" या वचनाचा संदर्भ देत नियमित योगाभ्यासामुळे शरीरात तेज, सामर्थ्य आणि सुदृढता निर्माण होते, ज्यामुळे रोगांपासून संरक्षण मिळते व वार्धक्याचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश शेटे यांनी केले. स्वाती डाके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर सरस्वती शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. मुलांसमवेत सर्वांनी नियमित योग करण्याची प्रतिज्ञा घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume