Top News

विजयसिंह घाडगे, रणजीत पाटील, देवा चव्हाण यांना शौर्य पुरस्कार; पवन माने, निलेश भोरडे यांचाही गौरव

 पुणे : युवा पिढीला आपल्या मतांचे प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. मात्र, भारत तेरे टुकडे होंगे अशा घोषणा मंजूर नाहीत. स्वातंत्र्यानंतर वर्दीतील ७८ हजार जवानांनी देशासाठी आपले प्राण गमावले आहेत. त्यांनी देशाचे तुकडे करण्यासाठी नव्हे, तर भारत अखंड ठेवण्यासाठी बलिदान दिले आहे. हा देश एकसंध, संघटित आणि महासत्ता बनविण्याची जबाबदारी आता तरुणांच्या हातात आहे. तरुणांनी देशाला अखंड ठेवून महासत्ता बनवावे. भारतीय सेना ही देशातील जनतेची सेना आहे आणि तिचा प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटला पाहिजे, असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार रणजीत पाटील, देवा चव्हाण, पवन माने आणि पोलीस हवालदार निलेश भोरडे यांना यंदाचा आठवा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) होते. विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त), संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. राजेंद्र निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राईक विषयी अनुभवकथन केले. 


विनायक पुरुषोत्तम डावरे म्हणाले, पोलीस हे समाजाचे अत्यंत आवश्यक घटक आहेत. मात्र, त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गुन्हा घडल्यानंतरच पोलिसांची आठवण येते. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून नागरिकांचे रक्षण करण्याचे पोलिसांचे कार्य अप्रतिम आहे. पोलिसांचे शौर्य पाहून विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळे पोलिसांचा सन्मान होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ८० वर्षांत दुर्दैवाने अनेक शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजविण्यात मागे राहिल्या. मात्र, जाधवर शैक्षणिक संस्था मागील बारा वर्षांपासून हे कार्य सातत्याने करत आहे.

अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, पोलिस आणि सैनिकांनी देशासाठी केलेले कार्य व त्यांचे बलिदान विद्यार्थ्यांना समजावे आणि युवकांना देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शौर्य पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. देशाची बाह्य सुरक्षितता जितकी महत्त्वाची आहे, तितकीच अंतर्गत सुरक्षितताही महत्त्वाची आहे. अंतर्गत सुरक्षा राखण्याचे महत्त्वाचे काम पोलीस करतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे.


जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे गेल्या आठ वर्षांपासून समाजात शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा यावेळी शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.



Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume