Top News

रसायू लाईफ सायन्सेसतर्फे संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन

 पुणे: "आयुर्वेद हा प्राचीन भारतीय वैद्यकीय ज्ञानवारसा असून, आय़ुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता आहे. आधुनिक काळात आयुर्वेदाचा अधिकाधिक प्रसार व प्रचार होण्याची आवश्यकता आहे. संशोधन व तंत्रज्ञानाच्या अंतर्भावाने आयुर्वेद अधिक समृद्ध होईल," असे प्रतिपादन संसदीय समितीच्या अध्यक्षा व राज्यसभा खासदार प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

जगभरातील नावाजलेल्या शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या रसायू लाईफ सायन्सेसच्या आयुर्वेदाशी संबंधित शोधनिबंधांची माहिती देणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणू



न बोलत होत्या. कर्वेनगर येथील रसायू लाईफ सायन्सेसच्या नवीन वास्तूमध्ये झालेल्या समारंभावेळी ज्येष्ठ उद्योजक विजय काळे आणि रसायू लाइफ सायन्सेसचे डाॅ. योगेश बेंडाळे व डाॅ. विनीता बेंडाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. नितीन करमाळकर, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, उद्योजक धन्यकुमार चोरडिया, डॉ. शर्मिला मांडे आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, "आयुर्वेद उपचारांचा उत्तम अनुभव मी स्वतः घेतला आहे. केंद्र सरकारकडून नेमलेल्या आरोग्यविषयक समितीची जबाबदारी नुकतीच माझ्याकडे सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, आयुर्वेदविषयक संशोधनाची दिशा, माहिती संकलन, केस स्टडीज तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेदाचे महत्त्व, प्रसार अशा मुद्यांचा विचार प्रामुख्याने सुरू आहे. डाॅ. बेंडाळे यांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व आणि शास्त्रीय संशोधनाचे सादरीकरण केले आहे. समिती या संशोधनाची माहिती घेऊन, तसेच सर्व आरोग्यतज्ज्ञांशी विचारविनिमय करून व्यापक हितकारी असे काम करेल."

विश्वास काळे म्हणाले, "आयुर्वेदशास्त्राशी तडजोड न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून डाॅ. बेंडाळे आणि त्यांचे सहकारी आयुर्वेदातील संशोधनाचे सादरीकरण करत आहेत, हे महत्त्वाचे आहे. केवळ परंपरेच्या आधारे कोणतेही दावे न करता, फक्त तथ्यांवर आधारित संशोधनप्रणाली त्यांनी अंगिकारली आहे."

डाॅ. योगेश बेंडाळे यांनी दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून मनोगत मांडले. गेल्या ३० वर्षांपासून कोणताही सरकारी निधी न घेता रसायू लाईफ सायन्सेस स्वयंप्रेरणेने संशोधनकार्य करत आहे. संस्थेकडे ४५ आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत, कर्करोगावरील संशोधनाला अमेरिका, युरोपीय देश, जपान आदि प्रगत देशांमधील मानांकित शास्त्रीय नियतकालिकांमध्ये स्वीकारले गेले आहे. संस्थेने ४५० हून अधिक शासनमान्य औषधे विकसित केली आहेत. माझ्यासह तज्ज्ञ सहकाऱ्यांनी १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आयुर्वेदाचे सादरीकरण केले आहे. लाखो रुग्णांवरील यशस्वी उपचारांचा अनुभव संस्थेकडे आहे. संस्थेचे कार्य केंद्रीय आयुष मंत्रालय तसेच ज्ञानप्रणाली मजबूत करण्याच्या केंद्र सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर वैज्ञानिकदृष्ट्या सादर करण्यासाठी संस्था सातत्याने संशोधन, उपचारपद्धतींचा विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील सादरीकरण करत आहे, असे ते म्हणाले.

डाॅ. प्रतीक तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनिता बेंडाळे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News
Media World News

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume