पुणे : पुण्यातील अभी ग्रुप संचालित अभी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, औषधांचे मोफत वाटप, पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट, टॉवेल, साबण व इतर आवश्यक वस्तूंचे वितरण, तसेच महाप्रसाद (अन्नदान) करण्यात आले.
यंदा या सेवाभावी उपक्रमाचा २,००० हून अधिक वारकरी बंधू-भगिनींना लाभ झाला. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या प्रवासात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचेही वाटप करण्यात आले.
हा उपक्रम अभी ग्रुपचे संस्थापक व प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र जोशी, व्यवस्थापकीय संचालक अभिषेक जोशी आणि डॉ. ज्योत्स्ना जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग कर्मचारी तसेच अभी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी सेवाभावाने कार्य करून वारकऱ्यांची सेवा केली.
दरम्यान, पुणे पोलीस उपआयुक्त कृषीकेश रावले यांनी या सेवा उपक्रमाला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत अभी चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
अभी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असून, वारकरी सेवेद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Post a Comment