Pune पुणे शहर पोलिस दलात 'गन मॅन' म्हणून विशेष ओळख असलेले धडाकेबाज पोलिस हवालदार शैलेश जगताप यांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली खंडणीची तक्रार पूर्णपणे खोटी आणि बनावट असल्याचे मुंबई उच्च न्यायालयानंतर आता पुणे सत्र न्यायालयानेही स्पष्ट केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २९ जानेवारी २०२४ रोजी संबंधित फौजदारी कारवाई रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ८ जुलै २०२६ रोजी पुणे सत्र न्यायालयानेही त्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याने शैलेश जगताप यांच्यावरील आरोपांचा शेवट झाला आहे.
शैलेश जगताप यांनी पुणे शहर पोलिस दलात तब्बल ३५ वर्षे सेवा बजावली असून, आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी कारवायांद्वारे गुन्हेगारीविरोधात प्रभावी कामगिरी केली. त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे त्यांची 'गन मॅन' अशी विशेष ओळख निर्माण झाली होती.
मात्र, त्यांच्या कारकिर्दीच्या ऐन भरात पुण्यातील कथित गुन्हेगार राहुल सुरेश खेतरे याने काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संगनमत करून जगताप यांच्या विरोधात खंडणीची खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे त्यांना मोठा मानसिक, सामाजिक आणि व्यावसायिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणात त्यांना तब्बल पाच वर्षे कारागृहात राहावे लागले. तसेच, सातत्याने करण्यात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर विभागीय कारवाई होऊन त्यांना पोलिस सेवेतून बडतर्फही करण्यात आले.
आता मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर पुणे सत्र न्यायालयानेही संबंधित खटला खोट्या आणि आधारहीन तक्रारीवर आधारित असल्याचे मान्य केल्याने शैलेश जगताप यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांच्यावरील कलंक दूर झाला असून, अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर त्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


Post a Comment