पुणे, दि. ३० जुलै : सीजीएचएस लाभार्थी कल्याण संघ, भारत (CGHS Beneficiaries' Welfare Association of India - CBWAI) यांच्या वतीने संस्थेचा ८ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्त AIMS हॉस्पिटल, औंध यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता कल्पतरू कम्युनिटी हॉल, एआरडीई इस्टेट, गणेशखिंड, पुणे (सीजीएचएस वेलनेस सेंटर क्र. ०५ जवळ) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी श्री. एम. व्ही. रमेश कुमार, उत्कृष्ट वैज्ञानिक तथा संचालक, आयुध संशोधन व विकास प्रतिष्ठान (ARDE), डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय, पुणे यांनी मुख्य अतिथी म्हणून तर डॉ. चंद्रप्रकाश चौधरी, अपर संचालक, सीजीएचएस, पुणे हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत असोसिएशनचे पदाधिकारी रंगनाथन कुमार, सुभाष धुळेकर, ज्ञानेश तांबेकर, पी. एस. भांटणकर (सचिव CGHS पेन्शनर असोसिएशन) यांनी दिली.
या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये लाभार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरिक व सीजीएचएस लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीजीएचएस लाभार्थी कल्याण संघ, भारत (CBWAI) – पश्चिम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सीजीएचएस लाभार्थी, निवृत्त केंद्रीय कर्मचारी, विविध शासकीय अधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे.


Post a Comment