Top News

दिशा परिवाराच्या वतीने २५० गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

 पुणे: "शिक्षणाचे व्यापारीकरण होत असताना माणुसकीच्या भावनेतून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शेकडो दाते पुढे येत आहेत. त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरत विद्यार्थ्यांनी प्रगतीच्या मार्गावर चालताना कृतज्ञ भावनेतून पुन्हा या कार्यात जोडून घेतले, ही सकारात्मक गोष्ट आहे. माणुसकी आणि कृतज्ञता याची सांगड घालणारा दिशा परिवाराचा हा उपक्रम स्तुत्य आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित दत्तात्रय वारे गुरुजी यांनी केले. महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेला गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी संस्था बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे परखड मत त्यांनी मांडले.

दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित २० व्या शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात दत्तात्रय वारे गुरुजी बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यात २५० गरजू विद्यार्थ्यांना देणगीदारांच्याच हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, उद्योजक गणेश जाधव, दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक रवीकुमार इंडी, माजी सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, दिशा परिवाराचे संस्थापक राजाभाऊ चव्हाण, शिष्यवृत्ती प्रदान समारंभ समितीचे अध्यक्ष सुजीत शिंदे, संस्थेचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी, कार्याध्यक्ष अरुण कुलकर्णी, विश्वस्त विवेक अगरवाल, सचिव निखिल पडवळ, चिन्‍मय कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी, विद्यार्थी, देणगीदार उपस्थित होते.


दत्तात्रय वारे गुरुजी म्हणाले, "शिक्षणाच्या व्यापारीकरणाला आळा घालण्यासाठी सरकारी शाळा सक्षम व्हायला हव्यात. यासाठी आम्ही काम करीत आहोत. मुलांची शैक्षणिक प्रगती होत नसेल, तर त्याची शंभर टक्के जबाबदारी शिक्षकांनी स्वीकारली पाहिजे. समर्पित शिक्षक, पालक आणि लोकसहभाग यांच्या बळावर सरकारी शाळांमध्ये मोठा बदल घडवून आणता येतो. समर्पित शिक्षक आणि लोकसहभागाच्या जोरावर महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्‍न व्‍हायला हवा."

राजीव खांडेकर म्हणाले, "शिक्षणाच्या बळावर प्रगती करताना ज्यांच्या पाठिंब्यामुळे आणि कष्टांमुळे आपण घडलो, त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत एक संवेदनशील माणूस म्हणून समाजाचे देणे फेडणे, हाच खऱ्या अर्थाने यशाचा आणि प्रगतीचा मार्ग आहे. दिशा परिवारासारख्या संस्थांच्या साथीने अडचणींवर मात करून यशाची शिखरे गाठताना समाज आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्यांचा विसर पडू देऊ नये. आजूबाजूला नकारात्मकतेचे सावट असतानाही दिशासारख्या संस्था समाजात आशेचे किरण पेरण्याचे मोलाचे काम करत आहेत." 


भाऊसाहेब जाधव म्‍हणाले, "दिशा परिवाराने शेकडो माणसे जोडत हजारो विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले आहे. या मदतीच्या पाठिंब्याने उभारलेले अनेक विद्यार्थी आज कृतज्ञ भावनेतून या कामात जोडले जात आहेत. दिशा परिवारात दाते व मदत घेणारे गरजू विद्यार्थी हे सर्व जाती-धर्माचे आहेत. त्‍यामुळे इथे केवळ शिष्यवृत्तीच दिली जात नाही, तर समाजाला एकसंध ठेवण्याची भावना रुजवली जाते."

दिशा परिवाराच्या कार्याविषयी सांगताना राजभाऊ चव्हाण म्हणाले की, गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम २० वर्षे चालू आहे, याचा आनंद वाटतो. 'आम्ही फक्त दोन हातातील अंतर कमी करतो' या ब्रीदवाक्यावर दाते आणि गरजू विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करता येतेय, याचे समाधान वाटत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

'बीएएमएस'च्‍या द्वितीय वर्षात शिकणारी साताऱ्याची पूजा बोरकर हिने दिशा परिवाराकडून मिळालेली शिष्यवृत्ती आणि वसतिगृहात राहण्याची झालेली सोय यामुळेच मला शिकण्याची संधी मिळाल्याची कृतज्ञ भावना व्यक्त केली. अनिरुद्ध करंदीकर यांनी विद्यार्थ्यांना एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) व तंत्रज्ञानाच्या युगात मोफत मार्गदर्शनाची तयारी दर्शवली. आरती भोसले यांनी दिशा केवळ आर्थिक मदत न देता देणगीदार आणि विद्यार्थी यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण करते, असे सांगत कौतुक केले. 

गणेश जाधव यांनी संस्थेचे हे कार्य सातत्याने वीस वर्षे चालू आहे, ही कौतुकाची गोष्ट असल्याचे सांगून या मदतीतून घडलेले विद्यार्थी आता या कामात पुन्हा जोडले जात आहेत, हे दातृत्वाचे मूर्त उदाहरण असल्याचे नमूद केले. रवीकुमार इंडी यांनीही मनोगत व्यक्त केले. सुजित शिंदे यांनी प्रास्‍ताविक केले. सूत्रसंचालन चिन्‍मय कुलकर्णी यांनी, तर शाम क्षीरसागर यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume