पुणे : महेश इंडस्ट्रियल ग्रुपच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ तसेच संस्थापक स्व. श्री. भगीरथजी तपाडिया यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ ‘संगम – वारशाचा गौरव, भविष्याची प्रेरणा’ या विशेष सोहळ्याने उत्साहात झाला. पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे महेश्वरी समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. गेल्या ५० वर्षांत महेश इंडस्ट्रियल ग्रुपने उद्योजकांना एकत्र आणत संवाद, ज्ञानविनिमय, परस्पर सहकार्य आणि उद्योजकीय विकासासाठी प्रभावी व्यासपीठ निर्माण केले आहे. संस्थापक स्व. श्री. भगीरथजी तपाडिया यांनी रुजवलेल्या उद्योजकीय मूल्यांचा आणि दूरदृष्टीचा वारसा पुढे नेत, सुवर्णमहोत्सवी वर्षात संस्थेला नव्या दिशेने आणि व्यापक व्याप्तीकडे घेऊन जाण्याचा संकल्प या सोहळ्यातून व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे विश्वस्त श्री. रतन राठी यांच्या स्वागतपर मनोगताने झाली. त्यानंतर विश्वस्त श्री. बजरंग लोहिया यांनी संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टे, पायाभरणी आणि गेल्या पाच दशकांत संस्थेला दिशा देणाऱ्या नेतृत्वाचा आढावा घेतला. संस्थेच्या प्रवासातील सातत्य, मूल्याधिष्ठित कार्यपद्धती आणि उद्योजकांना एकत्र आणण्याच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. या प्रसंगी डॉ. परिमल मर्चंट, डॉ. संजय मालपाणी आणि श्री. विनोद बहेती यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. डॉ. परिमल मर्चंट यांनी कुटुंब व्यवसायातील महिलांची भूमिका, मूल्याधिष्ठित नेतृत्व आणि व्यवसायातील सकारात्मक विचारसरणी यावर मार्गदर्शन केले. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या अध्यक्षा श्रीमती नेहा लड्डड यांच्या नेतृत्वाखाली महेश इंडस्ट्रियल ग्रुपच्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
संस्थेच्या विविध उपक्रमांची, सदस्यांची आणि गेल्या पाच दशकांत उभारलेल्या सामूहिक सामर्थ्याची सांगड घालत, संस्थेच्या विचारांचा आणि उद्योजकीय संस्कृतीचा देशभर विस्तार करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. देशभरातील उद्योजकांना जोडणे, ज्ञान व अनुभवांची देवाणघेवाण वाढवणे आणि नव्या पिढीला उद्योजकतेसाठी प्रेरित करणे हा या राष्ट्रीय उपक्रमाचा व्यापक उद्देश आहे.
कार्यक्रमादरम्यान विश्वस्त श्री. राजेंद्र तपाडिया यांनी संस्थेचे संस्थापक आणि त्यांचे वडील स्व. श्री. भगीरथजी तपाडिया यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. संस्थेच्या निर्मितीमागील त्यांचे योगदान, उद्योजकीय दृष्टी आणि समाजासाठी केलेले कार्य यांचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची बांधिलकी त्यांनी व्यक्त केली. संस्थापकांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ हा संपूर्ण सोहळ्याचा भावनिक आणि प्रेरणादायी केंद्रबिंदू ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री. कुश राठी आणि श्रीमती आकांक्षा राठी यांनी प्रभावीपणे केले. श्री. आदित्य तपाडिया यांनी आभार मानले. गोपाल झंवर आणि शाम भूतडा यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाला हीरालाल मालू, राजकुमार अग्रवाल, नितीन न्याती, विठ्ठल मनियार, अभय करवा, रवि राठी, गिरधर काळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. वारशाचा गौरव, वर्तमानातील कर्तृत्वाचा उत्सव आणि भविष्याची प्रेरणा यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून महेश इंडस्ट्रियल ग्रुपच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. संस्थापकांच्या विचारांना नवी दिशा देत, सामूहिक शक्तीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर उद्योजकतेचे नवे पर्व निर्माण करण्याचा निर्धार या सोहळ्यातून व्यक्त करण्यात आला.


Post a Comment