Top News

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज् असोसिएशनचे ७१ वे वार्षिक अधिवेशन

 पुणे : "साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता ‘मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून पाहण्याची गरज आहे. इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी यांसह विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून उद्योगाची आर्थिक व्यवहार्यता वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कार्यक्षमता वाढविण्यावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागेल," असे प्रतिपादन राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले. साखर उद्योग हे एक मोठे कुटुंब असून, या उद्योगाच्या प्रगतीमध्ये 'डीएसटीए'चे तंत्रज्ञान, संशोधन आणि मार्गदर्शन करण्यात महत्त्वाचे योगदान राहिले आहे, असे पाटील यांनी नमूद केले.

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज् असोसिएशनच्या (डीएसटीए) ७१व्या वार्षिक अधिवेशनात, तसेच साखर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियटमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी माजी मंत्री राजेश टोपे व दिलीप देशमुख, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, माजी आयएएस अधिकारी डॉ. शेखर गायकवाड, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील, दी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, दी साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष आर. व्ही. कुंभार, 'डीएसटीए'चे अध्यक्ष सोहन शिरगावकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष एस. डी. बोखारे, गुजरात उपाध्यक्ष मानसिंग पटेल, कर्नाटक उपाध्यक्ष सी. जी. माने, एस. एस. इंजिनिअर्सचे चेअरमन एस. बी. भड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट्सचे महासंचालक संभाजी कडू पाटील, श्री दत्त सहकारी कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील, कृष्णा समूहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले आदी उपस्थित होते.


अधिवेशनात साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव करण्यात आला. साखर उद्योग गौरव पुरस्कार एस. एस. इंजिनिअर्सचे चेअरमन एस. बी. भड, माजी मंत्री राजेश टोपे, गुजरात साखर संघाचे मानसिंहभाई पटेल, डॉ. सुरेश भोसले आणि कर्नाटकचे आमदार श्रीमंत पाटील यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार गोदावरी बायोरिफायनरी लिमिटेड, विलास सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना यांना देण्यात आला. इंडस्ट्रीयल एक्सलन्स अवॉर्ड मेरू इंडस्ट्रीजचे शरद गोरे, कॅन बायोसिसच्या संदीपा कानिटकर, केमिकल सिस्टीमचे अनुप केसरवाणी, टीकेआयएल इंडस्ट्रीज आणि स्वजित इंजिनिअरिंगचे अजित चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. टेक्निकल एक्सलन्स अवॉर्ड सुबोध जोशी, प्रमोदकुमार बेलसरे आणि श्रीपाद गंगावती यांना देण्यात आला. नव्वदीच्या पुढील ज्येष्ठ सदस्य पुरस्कार यशवंत घारपुरे, मानसिंगराव जाधव आणि पी. एन. राव यांना प्रदान करण्यात आला. जीवनगौरव पुरस्काराने बालाजी पाबशेटवार, डॉ. स्वेन, रमेश गंगाई, आर. एस. कुलकर्णी आणि आर. बी. माने यांचा गौरव करण्यात आला. डीएसटीए एक्सेप्शनल सर्विस अवॉर्ड एम. आर. कुलकर्णी, एस. बी. देव, जगदीश कुलकर्णी, डॉ. एस. एम. पवार आणि एस. डी. बोरुडे यांना देण्यात आला. बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड एस. एस. हेगाना, राजेंद्र भिलारे, नारायण मेहाना, डॉ. एम. बी. लोंढे, टी. एम. कर्णे आणि आर. बी. पाटील यांना प्रदान करण्यात आला.


जयंत पाटील म्हणाले, "साखर उद्योगासमोर सध्या बाजारातील चढ-उतार, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि सातत्याने वाढणारी किंमत स्पर्धा ही प्रमुख आव्हाने आहेत. पूर्वी साखर कारखाने सहा महिने चालत होते. त्यानंतर गाळपाचा कालावधी ९० ते १०० दिवसांपर्यंत आला आणि आता अनेक कारखाने केवळ तीन महिन्यांच्या हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक व्यवहार्यता कमी होत आहे. जगातील अनेक देशांतील साखर उद्योग वेगाने आधुनिक होत असताना भारतीय साखर उद्योगानेही बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे गरजेचे आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या संशोधनाचा प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये वापर वाढविण्याची गरज आहे. साखर कारखान्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, आधुनिक बॉयलर तंत्रज्ञान आणि डिजिटल मॉनिटरिंगचा वापर वाढविणे गरजेचे आहे."

आरोग्याविषयी वाढती जागरूकता आणि ‘साखर नको’ची मानसिकता हे उद्योगासमोरील भविष्यातील आव्हान आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतील आधुनिक तंत्रज्ञान व कार्यपद्धतींचा अभ्यास करून भारतीय साखर उद्योगाने बदल स्वीकारावेत. इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी यांसारख्या विविध उत्पादनांकडे वळून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करावेत. तसेच नव्या पिढीला उद्योगाशी जोडून तंत्रज्ञान, संशोधन आणि कार्यक्षमता वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.


प्रास्ताविकात सोहन शिरगावकर म्हणाले, "साखर उद्योगातील तांत्रिक प्रगती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यामध्ये डीएसटीएची महत्त्वाची भूमिका आहे. साखर कारखान्यांसमोरील तांत्रिक व औद्योगिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी तसेच देश-विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींची माहिती उद्योगातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डीएसटीए सातत्याने कार्यरत आहे. साखर उद्योग अधिक कार्यक्षम, स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी कारखाने, तज्ज्ञ, अभियंते आणि संशोधन संस्थांमध्ये समन्वय वाढविण्यावर संस्थेचा भर आहे. ७१ व्या अधिवेशनाला देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सर्वांचे स्वागत करतो."

प्रसंगी अधिवेशनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. एस.डी. बोखारे यांनी आभार मानले.



Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume