Top News

गो सन्मान अभियानांतर्गत लाखो सह्यांचे प्रार्थनापत्र पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

 पुणे, दि. २७ जुलै : गो सन्मान अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातून लाखो नागरिकांच्या सह्यांसह तयार करण्यात आलेले प्रार्थनापत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. या प्रार्थनापत्राद्वारे भारत सरकारसमोर गोसंरक्षणाशी संबंधित ३० हून अधिक महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

या मागण्यांमध्ये गोसंरक्षणासाठी केंद्रीय कायदा करणे, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देणे, गायरान व गोचर जमीन अतिक्रमणमुक्त करणे, स्वतंत्र केंद्रीय गो मंत्रालयाची स्थापना, राष्ट्रीय गोचर धोरण तयार करणे तसेच कृषी, पर्यावरण, औषध, शिक्षण आणि मानवी जीवनाशी संबंधित विविध गो-केंद्रित धोरणांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे प्रार्थनापत्र महामहिम राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 


गेल्या सहा महिन्यांपासून देशभरात महाराष्ट्र प्रभारी पू. बाळकृष्ण गोपाल महाराज आणि प्रांत प्रभारी पू. धनंजय गोपाल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जाती-धर्मातील संत, महात्मे, गोरक्षक आणि गोभक्तांच्या सहकार्याने जिल्हा प्रभारी दिनेश चौधरी व कार्यकारिणी समितीच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात २७ एप्रिल २०२६ रोजी देशभरातील सुमारे ५,००० तालुक्यांतून ५ कोटींहून अधिक नागरिकांच्या सह्यांसह याचिका राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच संबंधित राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्या मागण्यांवर अद्याप अपेक्षित निर्णय न झाल्याने दुसऱ्या टप्प्यात २७ जुलै २०२६ रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांतून पुन्हा स्मरणपत्र स्वरूपातील याचिका सादर करण्यात आल्या.

पुण्यातील मंगळवार पेठ येथील श्री सिद्धेश्वर मंदिरातून सकाळी 'श्री राम, जय राम, जय जय राम' या विजयमंत्राच्या सामूहिक जपाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गोपूजन व शंखनादानंतर पारंपरिक वेशभूषेतील गोभक्तांच्या उपस्थितीत शांततापूर्ण गो पदयात्रा काढण्यात आली. ध्वज, पताका, जनजागृतीपर फलक आणि घोषणांनी सजलेली ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून समाप्त झाली.

पदयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे अग्रभागी सजविलेली गोमाता आणि अभियानादरम्यान संकलित करण्यात आलेल्या लाखो स्वाक्षऱ्यांचे प्रतिकात्मक प्रदर्शन होते. संत, सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, मातृशक्ती, युवक, शेतकरी आणि मोठ्या संख्येने गोभक्त या अभियानात सहभागी झाले.

गोमातेच्या सेवा, सुरक्षा आणि सन्मानासाठी आयोजित या अभियानाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रेस प्रभारी रमेश ओसवाल यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume