पुणे, हिंजवडी :पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचलेले मार्ग तसेच पर्यायी रस्त्यांची माहिती नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत अभिनव उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमांतर्गत राहुल सोनवणे स्वतः घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे व्हिडिओ तयार करतात. हे व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुप, विविध समाजमाध्यमे आणि नागरिकांच्या नेटवर्कद्वारे तत्काळ प्रसारित केले जातात. त्यामुळे हजारो आयटी कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना रस्त्यांची वस्तुस्थिती वेळेवर समजून प्रवासाचे योग्य नियोजन करता येत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, खड्डे पडणे आणि काही मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरणे अशा समस्या वारंवार उद्भवतात. अशा वेळी वाहतूक विभागाच्या या डिजिटल माहिती मोहिमेमुळे नागरिकांना पर्यायी मार्गांची माहिती मिळत असून अनावश्यक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होत आहे.
याशिवाय, पावसाळ्यात वाहन चालवताना कोणती खबरदारी घ्यावी, पाणी साचलेल्या रस्त्यांवर सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे, वाहतुकीचे नियम कसे पाळावेत याबाबतही राहुल सोनवणे नियमितपणे जनजागृतीपर व्हिडिओ तयार करून नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.
याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे म्हणाले, "हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर दररोज लाखो नागरिकांचा प्रवास असतो. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची माहिती वेळेवर नागरिकांपर्यंत पोहोचल्यास त्यांचा वेळ, इंधन आणि मनस्ताप मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करून नागरिकांना तत्काळ आणि अचूक माहिती उपलब्ध करून देणे हाच या उपक्रमामागील उद्देश आहे."
हिंजवडी परिसरातील नागरिक, आयटी कर्मचारी आणि वाहनचालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आदर्श ठरत असल्याची भावना व्यक्त केली आहे.


Post a Comment