Top News

पुनीत बालन स्टुडिओजच्या '७५ इयर्स ऑफ एनडीए' माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार

 पुणे : पुनीत बालन स्टुडिओज निर्मित '७५ इयर्स ऑफ एनडीए' या माहितीपटासाठी मनवीर जसरोटिया यांना ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गैर-फीचर चित्रपट (Non-Feature Film) विभागातील सर्वोत्कृष्ट संकलन (Best Editing) या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली.

पुनीत बालन स्टुडिओज निर्मित हा माहितीपट खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (National Defence Academy - NDA) या देशातील तिन्ही सैन्यदलांसाठी अधिकारी घडविणाऱ्या अग्रगण्य प्रशिक्षण संस्थेच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला समर्पित आहे. एनडीएच्या स्थापनेपासून ते जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्थांपैकी एक होईपर्यंतचा प्रवास, त्यातील महत्त्वाचे टप्पे, परंपरा आणि भारतीय सशस्त्र दलासाठी घडविलेल्या अनेक पिढ्यांतील अधिकाऱ्यांचे योगदान या माहितीपटातून प्रभावीपणे उलगडण्यात आले आहे.


तनुज भाटिया आणि तनुका लाघाटे यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून मुग्धा कालरा यांनी लेखन केले आहे. दुर्मीळ संग्रहित दृश्ये आणि प्रभावी दृश्यात्मक कथनशैलीच्या माध्यमातून एनडीएचा नेतृत्व, शिस्त आणि उत्कृष्टतेचा वारसा प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या माहितीपटातील मनवीर जसरोटिया यांच्या उत्कृष्ट संकलनाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे.

      या राष्ट्रीय पुरस्कारामुळे पुनीत बालन स्टुडिओजच्या अर्थपूर्ण, प्रभावी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर दर्जेदार चित्रपट निर्मिती करण्याच्या वचनबद्धतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. 


"'७५ इयर्स ऑफ एनडीए'ला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हा सन्मान राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या गौरवशाली परंपरेला आणि देशसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या शूर अधिकाऱ्यांना समर्पित आहे. या प्रेरणादायी प्रवासाचे दस्तऐवजीकरण करण्याच्या आमच्या प्रयत्नाची सर्वोच्च स्तरावर दखल घेण्यात आल्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकलक मनवीर जसरोटिया आणि आमच्या संपूर्ण सर्जनशील टीमचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा सन्मान भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेला समर्पित आहे."

             - पुनीत बालन, निर्माते.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume